नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – एकल पालक असलेल्या मुलीला तिच्या आईचे जातीचे प्रमाणपत्र दिले जावे. मुलीला तिच्या आईची जात नाकारली जाऊ शकत नाही. असा महत्वपुर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमुर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मांडके यांच्या खंडपीठाने अमरावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना तरुणीचा अर्ज पुन्हा विचारात घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
नुपुर भागवत हिने आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या आईने १९९६ साली प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर त्यांना मुलगी झाली. पतीच्या त्रासाला कंटाळून ती पतीपासून विभक्त झाली. ती हलबा जातीची असून तिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर त्यांनीच मुलीचे संगोपन केले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज वडिलांचे दस्तऐवज नसल्याचे कारण देऊन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय म्हणाले न्यायालय ?
न्यायमुर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मोडक यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुलीला आईची जात नाकारता येऊ शकत नाही. तरुणीला तिच्या आईचे जात प्रमाणपत्र मिळावे असा निर्णय न्यायालयाने दिला. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज पुन्हा विचारात घ्यावा असे आदेश दिले आहेत.