पनवेल : बहुजननामा ऑनलाईन – पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांनी आणि भाच्याने मिळून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. विश्वनाथ गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात विश्वनाथ गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी(दि 5 ऑगस्ट) रात्री 11.30 च्या सुमारास पनवेल येथील रोडपालीजवळच्या गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर ही घटना घडली.
नेमकं काय झालं ?
नगरसेवकाच्या मुलांनी आणि भाच्याने विश्वनाथ गायकवाडच्या भावाला मारहाण केली होती. त्यांच्या विरोधात त्याने तक्रार दाखल केली होती. सिद्धार्थ असं विश्वनाथच्या भावाचं नाव आहे. तक्रार दाखल केल्याचा राग मनात ठेवूनच त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. काही कारणामुळे सिद्धार्थला मारहाण केल्यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु नगरसेवकाच्या मुलांविरोधात कोणी तक्रार कशी दाखल करू शकतो असे म्हणत जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी सिद्धार्थचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु सिद्धार्थ त्यांना काही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी याचा राग त्याचा भाऊ विश्वनाथवर काढला.
दरम्यान या प्रकरणी आता कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. कायद्याचा धाक उरला आहे किंवा नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.