नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक संसदेत सादर केल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानी शेअर बाजाराचा बेंचमार्क इंडेक्स KSE100 600 अंकांहून अधिक अंकांनी घसरला आहे. कलम ३७० रद्द करणारे विधेयक सादर केल्यानंतर जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करण्याचे विधेयकदेखील मांडण्यात आले. यामध्ये लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळं करत त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे.
६५० अंकांहून अधिक अंकांनी घसरला पाकिस्तानी बाजार
सोमवारी पाकिस्तानी शेअर बाजाराला सुरुवात झाली. केएसई 100 31666.41 वर उघडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत कलम ३७० च्या पहिल्या दोन तरतुदींमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला आणि राष्ट्रपतींनी त्यावर तत्काळ शिक्कामोर्तब केले. यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात खळबळ उडाली. कारभारादरम्यान केएसई100 687.45 अंकांनी घसरण होऊन तो 30 978.96 वर आला जो दिवसातील सर्वात कमी आहे.
जगातील सर्वात खराब प्रदर्शन करणारा शेअर बाजार
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी शेअर बाजार मागील दोन वर्षात सर्वात खराब प्रदर्शन करणारा ठरला आहे. गुंतवणुकदारांचे जवळपास 6,88,000 कोटी पाकिस्तानी रुपये बुडाले आहेत.
पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेत आल्यानंतर एका वर्षात पहिल्यांदाच लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी जुलैमध्ये सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांना देय संतुलन आणि कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 30 टक्क्यांनी घसरला आहे. इतकेच नाही तर येथील महागाईचा दर सुमारे 10.34 टक्के आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शंका आहे.