बारामती : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईतील मेट्रो कामासाठी आरे जंगलात करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडक निषेध व्यक्त केला आहे. त्यावेळी ते आरे इथे आले असता पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतले आहे. परंतु आंबेडकरांना ताब्यात घेण्यावर वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, बारामती येथे एसटी बसची तोडफोड केली. संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे.
आरे जंगलातील झाडे कापल्याने सध्या राज्यभरातून सरकार आणि मेट्रो प्रशासनाचा विरोध करण्यात येत आहे. अनेकांनी या वृक्षतोडीस विरोध दर्शविला आहे. त्यात आज डॉ. प्रकाश आंबेडकर देखील या वृक्षतोडी विरोधात निषेध व्यक्त करण्यास पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक झाल्याची माहिती काही वेळातच संपूर्ण सोशल मीडियावर वायरल झाली. त्यानंतर लगेच बारामती येथील गुणवाडी चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी एसटीवर दगडफेक करत बसची तोडफोड केली. बारामती – दौंड शटल हि शटल बस ४-५ तरुणांनी थांबविली. त्यानंतर एका तरुणाने ‘बाळासाहेबांना अटक केलेल्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध’ असा एक मजकूर चिटकवाला आणि बसवर दगडफेक केली. बसचे नुकसान झाले असून चालकाच्या शेजारी बसलेल्या एका वृद्धास बस ची काच लागली आहे. त्यानंतर आजूबाजूला एकच धावपळ उडाली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रकाश आंबेडकरांना पवई पोलीस स्टेशनला नेले आहे. याबाबत आंबेडकरांनी पोस्ट लिहीत माहिती दिली आहे. पोलिसांनी मला अटक केलेली नाही, त्यांनी फक्त ताब्यात घेतले आहे. मी पवई पोलीस स्टेशनमध्ये असून आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे आव्हान आंबेडकरांनी केले आहे.
Visit : bahujannama.com