उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – आरोपीचा मृत्यु झाल्यानंतर संतप्प झालेल्या जमावाने मृतदेह असलेली रुग्णवाहिका उभी करुन पोलीस ठाण्यावर हल्ला केला. जमावाच्या या हल्ल्यात वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावांला पांगविले. हा प्रकार वाशी पोलीस ठाण्यात मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीखक उस्मान शेख, पोलीस कर्मचारी परशुराम पवार व भागवत झोंबडे हे जखमी झाले आहेत. उस्मान शेख गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी उस्मानाबादला दाखल करण्यात आले आहे. पवार व झोंबडे यांच्यावर वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबतची माहिती अशी, वाशी तालुक्यातील पारा येथील रमज्या लाला काळे याला वाशी पोलिसांनी एका गुन्ह्यात १ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथून त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल केले गेले. उपचार सुरु असताना ४ एप्रिल रोजी त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे त्याचे नातेवाईक संतप्प झाले. रमज्या काळे याचा मृतदेह घेऊन सोलापूरवरुन रुग्णवाहिका रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गावात आली. त्याच्या नातेवाईकांनी ही रुग्णवाहिका थेट वाशी पोलीस ठाण्यासमोर नेऊन उभी केली. त्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यास घेराव घालून दगडफेक सुरु केली. त्यात पोलीस निरीक्षक उस्मान शेख व दोन कर्मचारी जबर जखमी झाले. याची माहिती मिळाल्यावर जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या ७ नळकांड्या फोडल्या. जखमी पोलिसांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल खांबे वाशीला पोहचले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.