उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाइन- उस्मानाबादकरांनी आतापर्यंत एक गाव एक गणपती ही संकल्पना पाहिली होती; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूम तालुक्याने एक नवा आदर्श निर्माण केला असून, “53 गावचा एक गणपती” ही संकल्पना राबवली आहे. पूर्ण तालुक्यात एकाच गणपती बसवला आहे.
जिल्ह्यात ‘एक गाव- एक गणपती’ तर शहरात ‘एक वॉर्ड- एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रबोधन करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी घेतला होता. त्यानुसार पोलीस ठाण्यांनी सार्वजनिक मंडळे, ग्रामसुरक्षा दल यांच्यासोबत बैठका घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात पोलिसांनी 350 हुन अधिक बैठकी घेउन त्यांचे प्रबोधन केले.
भुम पोलीसांनी भुम शहरासह एकुण 53 गावे आहेत. या सर्व गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रबोधन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह भुम पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे बैठका घेतल्या. तसेच त्यांचे प्रबोधन करून सार्वजनिक गणेश मंडळांशी 53 गावांचा एकच सार्वजनिक गणपती भुम पोलीस ठाण्यासमोर स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते पोलीस ठाण्यासमोर एकच गणपती बसविला आहे. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य हजर होते. गणेशोत्सव काळात या गणपतीची दोन वेळच्या आरतीची देखभालीसाठी जबाबदारी मंडळाना वाटुन देण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात या मंडळांतर्फे प्रतीदिनी जनजागृती, रक्तदान, वृक्षारोपन, गरजुंना अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर- मास्क वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
याअनोख्या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी भूम पोलिसांचे आणि भूमकरांचे विशेष कौतुक केले. तर आदर्श समाजास प्रेरणादायी ठरेल असा आशावाद व्यक्त केला आहे.