मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपला विरोधी बाकड्यावर बसावे लागले आहे. जास्त जागा मिळूनही सत्ता न मिळाल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यात आता बीड जिल्हा परिषद भाजपला मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, सुरेश धस यांच्या समर्थकांना आता आपल्या नेत्यासाठी विरोधीपक्षनेतेपदाची आस लागली आहे.
पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव स्वीकारावे लागल्याने राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्याचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होत आहे. सुरेश धस आधीच विधान परिषद आमदार आहेत. तर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषद देण्यात येऊ शकते.
दरम्यान विधानसभेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. तर विधान परिषदेत भाजपला कणखर विरोधीपक्षनेत्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांच्या रुपाने भाजपची ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र आता धस समर्थकच आपल्या नेत्यासाठी विधान परिषद मागत आहेत. त्यामुळे मुंडे आणि धस यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.