नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या खास शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविता आणि सादर करण्याची अनोख्या शैलीमुळे भल्या भल्यांना आपले हसू आवरात येत नाही. आज चक्क लोकसभेत राजस्थानातील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आठवलेंनी कवीतेतून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींवर सादर केलेल्या कवीतेवर नरेंद्र मोदींना ही आपले हसू आवरता आले नाही.
नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल अशी कवीतेची ओळ आठवलेंनी उच्चारताच मोदी हसू लागले. त्यापुर्वी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना कविता सादर केली… ‘एका देशाचं नाव आहे रोम, लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. ‘लोकसभेचं कामकाज तुम्हाला चालवायचं आहे, वेलमध्ये येणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करायचं आहे.’ हे ऐकताच बिर्लांनाही हसू फुटले. भारताची आम्हाला वाढवायचीय शान, ओम बिर्ला लोकसभेसाठी परफेक्ट मॅन अशा शब्दात आठवलेंनी आपल्या कवितेचा समारोप केला.
आपल्या कवितेतून आठवलेंनी फक्त बिर्लांचे अभिनंदन केलं नाही तर काँग्रेसला चिमटे काढण्याची संधी देखील सोडली नाही. आपण हवेची दिशा ओळखून भाजपसोबतच राहिलो, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर मिश्कील टीका ही केली.