बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) संशयाच्या भोवऱ्यात असणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. कालपासून भाजपनं सभागृहात सचिन वाझे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. सचिन वाझे यांची बदली झाली यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
‘जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही, तोवर अधिवेशन चालू देणार नाही’
प्रवीण दरेकर म्हणाले, जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे. या सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे. त्यांचं निलंबन करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंवर कारवाई करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केला.
कोण आहेत सचिन वाझे ?
1990 मध्ये सचिन वाझे सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात जॉइन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काउंटर केले आहेत.
अलीकडेच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.
सचिन वाझे जवळपास 13 वर्षांनंतर 6 जून 2020 रोजी पुन्हा पोलीस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबईत पोलिसातून राजीनामा दिला होता.
वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काउंटर केला आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
सचिन वाझेंसह 14 पोलीस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्ट आरोपी ख्वाजा युनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.
सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलीस फोर्सचा राजीनामा दिला.
30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलीस फोर्समध्ये परतले आहेत.