प्योंगयांग : वृत्तसंस्था – आशियात अमेरिकेचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मात्र अमेरिकेला चीन आणि उत्तर कोरियाकडून असणारा धोकाही चिंतीत टाकत आहे. सत्तेत आल्यानंतर बायडन यांच्या सरकारमधील परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लाइड ऑस्टिन यांचा पहिलाच विदेश दौरा असून ते चार दिवसांच्या आशिया दौऱ्यावर आले आहेत. यावेळी जपान आणि दक्षिण कोरियाला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंम जोंग उन यांची बहिण आणि सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या नेत्या किम यो जोंग यांनी शांतता राखायची असेल तर बायडन प्रशासनाने तणाव वाढवणाऱ्या धोरणांपासून चार हात लांब रहावे असे किम यो जोंग यांनी धमकी दिली आहे.
उत्तर कोरियाची शासकीय वृत्तसंस्था केसीएनएने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावावरही किम यो जोंग यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की उत्तर कोरियासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताकाळात चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला एक सला देऊ इच्छितो की, जर शांतता हवी असेल तर अमेरिकेने आमच्या भागात तणाव वाढवणाऱ्या धोरणांपासून दूर रहावे कोरियन भागात दारूगोळ्याची दुर्गंधी फैलावण्याची त्यांची इच्छा असली तरी दूर रहावे असा इशारा त्यानी अमेरिकेला दिला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाबरोबर संवाद साधण्याचे अमेरिकेने महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, आशिया-पॅसिफिक विभागामध्ये पुन्हा परतण्याच्या दृष्टीने पहिल्याच महिन्यात प्रयत्न सुरू केले आहेत. या विभागातील स्थैर्य कायम ठेवणे, या प्रमुख मुद्द्यावर राजनैतिक प्रयत्न करण्यात येत आहेत.