बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्रा, जोंग उन जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वीही किम जोंग उनच्या मृत्यूचे वृत्त उत्तर कोरियाने फेटाळलं होते.
किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम असून ते जिवंत आहेत. 13 एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी दिली. उत्तर कोरियाचे संस्थापक आणि त्यांचे आजोबा यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आले होते. 15 एप्रिलचा दिवस हा उत्तर कोरियाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. 2011 मध्ये आपल्या वडिलांच्या हातून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत या दिवशी होणारा कार्यक्रम कधीही चुकवला नव्हता. काही दिवसांपूर्वी उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचे उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाल्या होती.