पुणे : बहुजननामा ऑनलाईन – “माझा आवाज कोणी दाबू शकत नाही” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलून दाखवलं. त्यांनी गमतीने उच्चारलेल्या या वाक्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बाणेर येथील कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेने बाणेर येथे उभारलेल्या कोविड सेंटरचे उदघाटन पार पडले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना माईक मधून आवाज येत नव्हता. तेव्हा पत्रकारांनी त्यांना आवाज आवाज असे म्हणू लागले, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेत “माझा आवाज कोणी दाबू शकत नाही.” असे विनोदाने म्हणाले हे ऐकताच त्यांच्या बाजूस उभारलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हसू आवरले नाही.
तेव्हा बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात भव्य असे रुग्णालय उभारण्यात आले. या माध्यमातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. सध्याची वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असून अधिकाधिक तपासण्या झाल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर संकटाच्या काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढण्याचा निर्धार आम्ही केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.