नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी आता केवळ एक दिवस बाकी आहे. परंतु, ज्या पद्धतीने दोषींनी आपल्याला वाचवण्यासाठी कायद्याचे डावपेच केले आहेत ते पाहता 1 फेब्रुवारीला त्यांना फाशी होणे अशक्य असून ही फाशी आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. चौघांपैकी एक दोषी पवन गुप्ताने यापूर्वी आपण घटनेच्या दिवशी अल्पवयीन असल्याचे म्हणत याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. आज त्याने पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
तसेच मुकेश सोडून अन्य तीन दोषींकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा पर्याय शिल्लक आहे. दोषी विनयने राष्ट्रपतींकडे आपली दया याचिका पाठवली आहे. जर राष्ट्रपतींकडून सुद्धा त्याची याचिका परत पाठवण्यात आली तर मुकेशप्रमाणे तिघे पुन्हा न्यायालयात जाऊ शकतात. निर्भयाच्या गुन्हेगारांचे वकील एपी सिंह यांच्याकडून पटियाला हाऊस कोर्टात अर्ज देण्यात आला असून फाशीची तारीख आणखी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. दोषींकडून यावेळी दिल्ली प्रीजन रूल्सचा संदर्भ देण्यात आला आहे. या अर्जात दिल्ली कारागृहाशी संबंधित नियमांचा संदर्भ देण्यात आला आहे. या वकीलांनी म्हटले आहे की या नियमांतर्गत चार दोषींना फाशी देता येणार नाही, जो पर्यंत शेवटचा दोषी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करत नाही.
विनयची दया याचिका प्रलंबित
यापूर्वी विनयने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दया याचिका पाठवली होती. दोषी विनयचे क्यूरेटिव पिटीशन अगोदरच फेटाळण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंहची दया याचिका 17 जानेवारीला फेटाळली होती. या निर्णयाची पुनर्विचार याचिकासुद्धा कोर्टाने फेटाळली होती. आता मुकेशजवळ फाशीपासून वाचण्याचा कोणताही पर्याय बाकी नाही.
चारही दोषींची सध्याची स्थिती
– दोषी मुकेश सिंहची क्यूरेटिव पिटीशन आणि दया याचिका दोन्ही फेटाळण्यात आली आहे. त्याच्याकडे आता कोणताही पर्याय नाही
– दोषी अक्षय ठाकुरची क्यूरेटिव पिटीशन फेटाळण्यात आले आहे. आता त्याच्याकडे दया याचिकेचा पर्याय बाकी आहे.
– दोषी विनय शर्माचे क्यूरेटिव पिटीशन यापूर्वी फेटाळण्यात आले आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे.
– दोषी पवन गुप्ताजवळ अजून दोन पर्याय बाकी आहेत. तो क्यूरेटिव्ह पिटीशन आणि दया याचिका दोन्ही करू शकतो. त्याने आज याचिका दाखल केली आहे.
74 ते 75 दिवस आणखी लागतील
या प्रकरणी निर्भयाच्या आईच्या वकीलांनी यापूर्वीच सांगितले होते की, या प्रकरणात आणखी 74 ते 75 दिवस लागू शकतात. न्यायामूर्तीना समजले आहे की कालावधी वाढविण्याचे हे प्रयत्न आहेत. नवे डेथ वॉरंट जारी झाले आहे, परंतु, आज फाशीच्या आदल्या दिवशी पवन गुप्ता सुप्रीम कोर्टात गेल्याने फाशी थांबू शकते. दोषींचे वकील प्रकरण आणखी ताणण्याच्या प्रयत्नात आहेत. एका दोषीच्या वयावरून अक्षेप घेतला जात आहे. तो घटनेच्या दिवशी अल्पवयीन होता, असे म्हटले जात आहे.
अशी आहे घटना
16 डिसेंबर, 2012 च्या रात्री 23 वर्षीय एक पॅरामेडिकलची विद्यार्थीनी आपल्या मित्रासोबत दक्षिण दिल्लीच्या मुनिरका परिसरात बस स्टँडवर उभी होती. दोघेजण चित्रपट पाहून घरी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बसची वाट पहात होते. यावेळी ते एका खासगी बसमध्ये बसले. या चालत्या बसमध्ये एका अल्पवयीनासह सहा लोकांनी तरूणीवर सामुहिक बलात्कार केला आणि तिला अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पीडितेला चालत्या बसमधून फेकून दिले होते. गंभीर जखमी अवस्थेत तिला आणखी चांगल्या उपचारासाठी सिंगापुरला नेण्यात आले. तेथे 29 डिसेंबर 2012 ला तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पीडितेला निर्भया हे काल्पनिक नाव देण्यात आले.