बहुजननामा ऑनलाइन टीम – मकर संक्रातीपासून अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणीचे काम काम सुरु होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी दिली होती. त्यावरुन शिवसेनेने सामनातून सवाल उपस्थित केले होते. त्यातच आता शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो ट्विट करत भाजपा नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.
वाडा शहर येथील शिवसेना कार्यालय उभारण्यासाठी मदतनिधी गोळा करण्यात येतोय. तोच धागा पकडून निलेश राणे म्हणाले, “राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभे राहणे जास्त गरजेचे आहे, असे काहींना वाटत. राम मंदिरासाठी मागितली तर वर्गणी चुकीची. पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालत. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’,” असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो 'बाब्या' दुसऱ्याचा तो 'कारटा'. https://t.co/gpka5hVjRM pic.twitter.com/O1jRWPH7fv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 30, 2020
सामनात शिवसेनेने काय म्हटलं होते?
देशातून चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक वर्गणीच्या कामासाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल. मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा भाजप त्याच वणव्यावर भाजलेल्या पोळ्या खात आहे.
अर्थात आम्हाला त्याचे दुःख नाही. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी रामलल्लाच्या बँक खात्यात जमा केला. याकामी अयोध्येत रामलल्लाच्या नावे बँक खाते उघडले असून त्यात जगभरातील रामभक्त सढळ हस्ते मदत करीत आहेत. एव्हाना मंदिरासाठी लागणारा ३०० कोटींचा निधी प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमाही झाला असेल, असे शिवसेनेने म्हटले होते.