पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दररोज नवे कोरोना रुग्ण उच्चांक गाठत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुण्यात १२ तासांचा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ७ दिवस बंद राहणार. फक्त होम डिलिव्हरी करण्यास परवानगी आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. फक्त मर्यादित लोकांसह अंत्यविधी आणि विवाहसोहळे होतील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत २० आणि लग्नासाठी जास्तीत जास्त ५० लोकं उपस्थित राहू शकतील. धार्मिक स्थळेही सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. हे नवे नियम ३ एप्रिल २०२१ पासून लागू होतील, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. आठवडाभरानंतर म्हणजे ९ एप्रिल २०२१ ला परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.