बहुजननामा ऑनलाईन : उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून रंगलेली आहे. परंतु अजूनही त्यांचा अंतिम निर्णय ठरत नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याने खासदार उदयनराजे भोसले आहेत तिथेच थांबले , अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना यू-टर्न मिळाल्याचे म्हंटले जात आहे. पुण्यात भाजपा प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित करण्यात आली. यामुळेही उदयनराजेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाबाबत राज्यात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचं समजतं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीदेखील उदयनराजेंची भेट घेत त्यांचे मत वळविण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीतच राहायचं यासाठी उदयनराजेंनी पुण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी अनेक कार्यकर्तेदेखील पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नवे वळण घेतले.
या बैठकीनंतर उदयनराजे हे भाजप प्रवेशावर यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे म्हंटले जात आहे.‘आहे तिथंच उत्तम आहे. भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याचा आग्रह केला असून उदयनराजेंनीदेखील कार्यकर्त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्याविरुद्ध टोकाचा प्रचार केला होता. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकीटावर पुन्हा पोटनिवडणुकीला उभे राहणे जोखमीचे आहे . त्यामुळे उदयनराजे संभ्रमात असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजपा प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी चर्चा सुरु आहे.