मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. हे तर आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तारखेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील. असे सांगितले जात आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, उदयनराजेंना जोरदार शक्तीप्रदर्शनासह पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.