बहुजननामा ऑनलाईन – बिहारमधील एका आमदाराला पत्नीसोबत बनविलेला टिकटॉक व्हिडीओ चांगलाच महागात पडला आहे. पत्नीसोबत बनविलेला टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांची प्रतिमा मलिन होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या जुमई जिल्ह्यातील सिकंदरा येथील कॉंग्रेसचे आमदार सुधीरकुमार चौधरी यांनी पत्नीसोबत काही दिवसांपुर्वी खाजगीत एक टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी आता पोलीसांकडे धाव घेतली आहे.
चौधरी यांनी शुक्रवारी (ता.३०) पोलीसांकडे तक्रार दाखल करुन व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पत्नीसोबत बनविलेला व्हिडिओ खाजगी होता. पण कुणीतरी आपल्या पत्नीचे टिकटॉक खाते हॅक करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यात तो व्हायरल झाल्याने त्यांची प्रतिमा सोशल मीडियावर डागाळली जात आहे. दरम्यान त्यांनी दोन लोकांची नावे घेतली आहेत. हो दोन लोक त्यांचे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.