सांगली : बहुजननामा ऑनलाईन – कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचा खून करण्यात आला आहे. अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा खून केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मनोहर पाटील हे बुधवारी सायंकाळी देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले होते तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शास्त्रांनी वार करून हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर ग्रामस्थानी पाटील यांना तातडीने मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.मात्र त्यांचा उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे मनोहर पाटील हे गावचे उपसरपंच राहिले आहेत.तसेच 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. पाटील यांनी कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पद भूषवले होते. पाटील सध्या कवठेमहांकाळ येथील महंकाली साखर कारखान्याचे संचालक होते. ह्या प्रकरणावरून गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
या खुन प्रकरणावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पूर्ववैमनस्यातुन हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वेगाने तापास सुरु केला आहे. चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांचीदेखील हत्या करण्यात आली होती. आणि बुधवारी आणखी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.