जगदलपुर वृत्तसंस्था – सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केलेल्या नक्षल चळवळीतील माओवादी केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकरन याने तेलंगणा पोलिसांसमोर पत्नीसह आत्मसमर्पण केल्याची माहिती झारखंड पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. सुधाकरनवर १ कोटी तर त्याची पत्नी निलीमा हिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षिस होते. मात्र तेलंगणा पोलिसांनी याची अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
सुधाकरन याने आत्मसमर्पण करणे ही बाब नक्षल चळवळीला मोठा झटका मानला जात आहे. पती पत्नीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे झारखंड पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले. मात्र तेलंगणा पोलिसांनी याची अधिकृत घोषणा करणे अजून बाकी आहे. नक्षली नेता अरविंद याच्या मृत्यूनंतर झारखंड आणि छत्तीसगडमध्ये नक्षली संघटना त्याच्याच नेतृत्वाखाली काम करत होत्या.
कोण आहे सुधाकरन ?
सुधाकरन हा माओवादी सेंट्रल कमिटीचा सदस्य आहे. तो ओगू, सतवाजी, बुरयार, सुधाकर, आणि किरण या नावांनी ओळखला जातो. तसेच तो आणखी काही नावांनी ओळखला जातो. त्याने झारखंडमध्ये तेंदूपत्ता व्यापाऱी आणि कंत्राटदारांकडून खंडणी उकळून मोठी मालमत्ता जमविली आहे. तो आपला मित्र सत्यनारायण याच्या माध्यमातून पैसे व्यवसायात गुंतवतो आहे.