मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबईतील वजनदार नेते माजी मंत्री गणेश नाईक ५२ नगरसेवकांसह भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांन दिली आहे. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक आपल्या निवास्थानी बोलवली असून या बैठकीत भाजप प्रवेशावर निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून आता भाजप प्रवेश करावा असा दबाव गणेश नाईक यांच्यावर वाढत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत भाजपला आणखी एक खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे.
मागील २० वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांची सत्ता आहे. मात्र मागील निवडणूकीवेळी महापालिका प्रभागांनुसार झालेले मतदान शिवसेनेला जास्त झाल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोका निर्माण झाला असून पुढील महापालिका निवडणूकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे झाले आहे. त्यामुळे हे टाळायचे असेल तर भाजपमध्ये प्रवेश करणे हा सत्ता राखण्याचा उत्तम मार्ग आहे. असे मत सर्वांचे आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांसह नेतेही भाजपात जाण्याच्या मार्गवर आहेत.