बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी मुंबईत वाशी पुलावर एक तरुणी गंभीर अवस्थेत सापडली (raped)आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. तिच्या डोक्याला गंभीर जखमाही दिसत आहेत. सदर तरुणी ही 25 वर्षांची आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळं आता पोलीस सध्या तरुणी शुद्धीवर येण्याची वाट पहात आहेत. ती शुद्धीत आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल.
पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितलं की, आम्ही पनवेल, ठाणे आणि वाशीपर्यंत हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाईनवरील सर्व सीसीटीव्ही तपासले. परंतु सदर तरुणी ट्रेनमध्ये चढताना कोणत्याही सीसीटीव्हीत दिसलेलं नाही. डोक्यावरील जखमा पाहता तरुणीवर जड वस्तूनं हल्ला झाल्याचं आणि शरीरावरील जखमांवरून चालत्या ट्रेनमध्ये फेकल्याचं दिसत आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर आता पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हाही नोंदवला आहे. कारण जेजे रुग्णालयानं त्यांच्या रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराची शक्यता वर्तवली आहे. आता पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
अशी समोर आली घटना
वाशी रेल्वे स्टेशनच्या मॅनेजरनं जीआरपी कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एक तरुणी पुलावर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती दिली. वाशी स्थानकापासून अडीच किमी अंतरावर ही तरुणी आढळली.
यानंतर सदर जखमी तरुणीला शिंदे यांनी रुग्णालयात दाखल केलं. वाशीमधील एनएमएमसी रुग्णालयात तिला प्राथमिक उपचार देण्यात आले. तिची तपासणी केल्यानंतर तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. सदर तरुणी एवढी गंभीर अवस्थेत होती की, तिला नावंही सांगता आलं नाही.
सदर तरुणी ऑक्सिजन सपोर्टवर आहे. त्यामुळं जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना जबाब नोंदवण्यास मनाई केली. पोलिसांना माहिती मिळाली आहे की, सदर तरुणी टिटवाळ्याची आहे. पवईत ही तरुणी मोलकरीण म्हणून काम करत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आठवड्याच्या शेवटी ती घरी येत असे आणि रविवारी पवईतून निघाली तेव्हा कुटुंबाचं तिच्याशी बोलणं झालं होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.