हैद्राबाद : वृत्तसंस्था – एका कॉलेजमध्ये तालिबानी फतवा जारी करण्याता आला आहे. कॉलेजमधील लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, विद्यार्थीनींनी गुडघ्याच्या खाली लांब कुर्ता घालणे अनिवार्य आहे. असा कुर्ता घातला असेल तरच त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळत आहे. सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेजमधील ही घटना आहे. विद्यार्थीनींच्या कुर्त्याचं मोजमाप करण्यासाठी एक महिला सुरक्षारक्षकही निुयक्त केली आहे. जी मुलींचं ओळखपत्र तपासून त्यांच्या कुर्त्यांचं मोजमाप करते. आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबादमधील ही घटना आहे.
जर विद्यार्थीनींनी कपड्यांबाबतचा हा नियम पाळला नाही तर त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नाही. विद्यार्थीनींनी या नियमाचा कडाडून विरोध केला आहे. तशा विरोधातील पोस्टही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सेंट फ्रान्सिस गर्ल्स कॉलेजने 1 ऑगस्टपासून तालिबानी फतवा काढला आहे की, विद्यार्थीनींनी गुडघ्याच्या खाली लांब कुर्ता घालणे अनिवार्य आहे.
‘लांब कुर्ते परिधान केल्यास लग्नासाठी चांगली स्थळं येतील’
एका व्हिडीओच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीनं सांगितलं की, “कॉलेज प्रशासनाकडून मध्य सत्रात नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. लांब कुर्ते/ ड्रेस परिधान केल्यास लग्नासाठी चांगली स्थळं येतील असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. याविरोधात आवाज उठवणं योग्य नाही, असंही कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बजावलं आहे. गुघड्याच्या किंचितसा जरी वर कुर्ता किंवा ड्रेस असेल तर आमचा छळ केला जात आहे. ज्या विद्यार्थीनी या नियमांचं पालन करत नाहीत त्यांना कॉलेजच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली जाते. त्यामुळे आमच्या अभ्यासाचं नुकसान होत आहे.” असा आरोप त्या विद्यार्थीनीने केला आहे. सध्या या विद्यार्थीनीचा हा व्हिडीओ सोशल व्हायरल होत आहे.