रियाध : जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किंमतीनी गेल्या २८ वर्षातील तेजी गाठली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १४ जानेवारी १९९१ पासून एका दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे. कच्चे तेल महाग झाल्यामुळे भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी भाव वाढ होऊ शकते. येत्या १५ दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ ते ७ रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यताही तीव्र झाली आहे,’असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शनिवारी सौदी अरेबियाच्या तेल कंपनी अरामकोच्या अबक आणि खुरैसमध्ये स्थित तेल विहिरींच्या ड्रोनवर शनिवारी हूथी बंडखोर संघटनेने हल्ला केला. त्यानंतर सौदी अरेबियाच्या तेल कंपनीने उत्पादन जवळपास निम्म्याने कमी केले आहे. हा हल्ला झाला त्या तेल विहिरी दुरुस्त करण्यासाठी येत्या दोन दिवस उत्पादन कमी राहणार असल्याचे सौदी तेल कंपनी अरामकोने म्हटले आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड १९. ५ टक्क्यांनी वाढून ७१.९५ डॉलर प्रति बॅरल झाला. तेल एका दिवसात २० टक्क्यांनी वाढले असल्याचे क्रूड ऑईल-ऑईल प्राइस डॉट कॉमच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी तेजी आहे.
सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे आणि सरकारी तेल उत्पादक सौदी अरामको यांच्या हल्ल्यामुळे कंपनीने दररोज ५७ लाख बॅरेलचा पुरवठा कमी केला आहे, जो जागतिक पुरवठा ६ टक्के आहे. केडिया कमोडिटीजचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडियायांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतावर परिणाम होईल. भारतामध्ये कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी सौदी अरेबिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. सौदी अरेबिया हे कच्च्या तेलाची दुसर्या क्रमांकाची निर्यात करणारा देश आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचा परिणामही भारतावर होणार आहे.
ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पर्यंत पोहोचू शकते. महागड्या कच्च्या तेलाचा फटकादेखील रुपयावर पडेल आणि रुपया ५ ते ८ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. महागडे कच्चे तेल आणि कमकुवत रुपया यामुळे पुढील १० दिवसांत देशात पेट्रोलच्या किंमतीत ७ रुपयांची वाढ होऊ शकते. दरम्यान किंमतींच्या वाढीचा परिणाम भारताच्या तेल आयात बिलावर तसेच वित्तीय तुटीवर होणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति डॉलरच्या वाढीचा परिणाम वार्षिक आधारावर भारताच्या आयात बिलावर होईल. आर्थिक वर्ष २०१८- १९ मध्ये भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवर सुमारे १११.९ अब्ज डॉलर्स खर्च केले होते.