नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमारमधील लष्करी सत्तांतराचे समर्थन करणे चीनला महागात पडत असल्याचे दिसत आहे. चीनी गुंतवणूक असलेल्या एकुण 32 कारखान्यांवर हल्ला झाल्यानंतर चीनचे मोठे नुकसान झाले आहे. लोकशाही समर्थक आंदोलनकर्त्यांनी म्यानमारच्या क्रुर लष्कराला सहकार्य केल्याने आपला राग चीनी कारखान्यांवर काढला आहे.
32 कारखाने झाले भस्मसात
म्यानमारमधील शहर यंगूनमध्ये चीनी गुंतवणुक असलेले सुमारे 32 कारखाने आहेत. आंदोलनकर्त्यांनी या कारखान्यांना आग लावली आणि सोबतच अनेक कारखान्यांमध्ये लूटमार सुद्धा केली. कारण, म्यानमारमध्ये सत्तांतराच्या मागे चीनचा हात असल्याचे म्हटले जात आहे. कारण चीन मोठ्या कालावधीपासून तेथील लोकशाही सरकारमुळे खुश नव्हता.
हल्ल्यात 260 कोटीपेक्षा जास्त नुकसान
म्यानमार येथील चीनी दूतावासानुसार, यंगूनमध्ये चीनच्या एकुण 32 कारखान्यावरील हल्ल्यात सुमारे 260 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या कारखान्यांमध्ये काम करणारे चीनचे दोन नागरिक सुद्धा जखमी झाले आहेत.
तिकडे, चीनी परराष्ट्र मंत्रालयाने हल्ले रोखण्यासाठी आणि चीनी कर्मचारी आणि उद्योजकांच्या सुरक्षेसाठी म्यानमारच्या लष्कराशी चर्चा केली आहे. सोबतच चीनने हल्ला करणार्या आंदोलनकर्त्यांना शिक्षा करण्यास सुद्धा सांगितले आहे.
कारखान्यांच्या परिसरात मार्शल लॉ
चीनी सरकारच्या या निर्णयानंतर म्यानमारच्या लष्करी सरकारने या कारखान्यांच्या परिसरात मार्शल लॉ घोषित केला आहे. म्यानमारच्या सामान्य लोकांनी चीनच्या या वक्तव्यावर कठोर टिका केली आहे. म्यानमारच्या लोकांमध्ये चीनच्या विरूद्ध आक्रोश रोज वाढत चालला आहे.
सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी चीनच्या वक्तव्यावर टिका केली आहे. एका यूजरने लिहिले आहे की आम्ही पूर्णपणे आपल्या हितासाठी उभे राहून चीनी दूतावासाच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत.
शांततापूर्ण विरोध आंदोलनादरम्यान शेकडो लोकांचा बळी जाऊनही चीन येथील लष्करी सत्तेचीच बाजू घेत आहे. यामुळे अनेक यूजर्स सोशल मीडियावर चीनविरूद्ध लिहित आहेत.
आतापर्यत 138 आंदोलनकर्त्यांचा बळी
संयुक्त राष्ट्राने म्हटले की, एक फेब्रुवारीला झालेल्या लष्करी सत्तांतरानंतर शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या म्यानमारमध्ये किमान 138 आंदोलनकर्त्यांचा बळी गेला आहे.