मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – नुकत्याच संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांच्या खासगीकरणाची घोषणा झाल्यानंतर त्या बँका कोणत्या याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, एका रिपोर्टनुसार बँक ऑफ महाराष्ट्राचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. यानंतर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉज फेडरेशनने पत्रक काढले असून यामध्ये खासगीकरणाच्या यादीत महाराष्ट्रातील लोकप्रीय बँक ऑफ महाराष्ट्राचे नाव आणणे हा खोडसाळपणा आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात कोणतेही विधान केले नसल्याने नागरिकांनी ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. या बँकेचे सार्वजनिक स्वरुप कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे म्हटले आहे.
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी हे पत्रक काढले असून हा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. महाबँकेतील सर्व संघटना बँकेच्या भल्यासाठी नेहमीच अग्रसर असतात. बँक ऑफ महाराष्ट्राचे सार्वजनिक स्वरुप अबाधित रहावे यासाठी या संघटने तर्फे सर्व प्रयत्न केले जातील. ही बँक सामान्य माणसांची असून तिचे ते स्थान अढळ रहावे असाच आमचा प्रयत्न राहील, असेही पत्रकात म्हटले आहे.
बँकेचे नाव घेणे हा खोडसाळपणा
बँक ऑफ महाराष्ट्राचे खासगीकरण होणार असल्याचे अनेक बातम्यांमधून सूचित करण्यात येत आहे. मात्र या बातम्यांना कोणतीही वस्तुस्थितीचा आधार नाही. सरकारने यासंदर्भात कोणतेही विधान केले नसल्याने या बँकेचे नाव घेणे हा खोडसाळपणा आहे. मात्र, यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. सामान्य माणसांची बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र ही नफ्यातील बँक असून ती सर्व वित्तीय निकषांवर उत्कृष्ट काम करीत असल्याचा दिलासा पत्रकात देण्यात आला आहे.
आरबीआयने पुढे येऊन वस्तुस्थिती मांडावी
पत्रकात पुढे म्हटले आहे की, येस बँक, पीएमसी बँक आदी बँकांच्या अनुभवानंतर नुकतेच रिझर्व्ह बँकेने अनेक सहकारी बँकांवर निर्बंध लादल्याने सामान्यांचा बँकिंग क्षेत्रावरचा विश्वास उडाला आहे. हा विश्वास पुन्हा यावा यासाठी रिझर्व्ह बँकेनेच पुढे येऊन वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. तसेच अशा स्थितीत नागरिकांनी ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. अशा बातम्यांचा आधार घेऊन काही दलाल शेअर बाजारात वारेमाप नफा कमावत आहेत. यासंदर्भात सेबी ने देखील हस्तक्षेप करुन स्पष्टीकरण द्यायला हवे, असे पत्रकात म्हटले आहे.