पनवेल : बहुजननामा ऑनलाइन – एपीएमसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
संतोष नामदेव पाटील (वय-47 रा. खारघर, सरस्वती को.ऑ.हौ. सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी ते रहात असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पाटील हे 11 मार्च 2019 पासून खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. परंतु 30 जानेवारी 2021 पासून ते कामावर हजर झाले नाहीत. कामावर न येण्याबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण पोलिस ठाण्यात दिले.
वैद्यकीय दाखला घेऊन ते पुन्हा कामावर येतील असे वाटत असतानाच सोमवारी रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सोमवारी रात्री पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यांनी खोलीतील फॅनच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच घरातील लोकांनी त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतोष पाटील यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.