बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : दही खाल्ल्याच्या रागातून पत्नीला चाकूने भोसकून तिच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला सत्र न्यायालयाने आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सचिन मलोरे (रा. अॅन्टॉप हिल )असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दरम्यान निकाल सुनावतना पीडित महिला ही आरोपीची पत्नी असली तरी तिला या हल्ल्यामुळे झालेल्या त्रासाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही,’ असे मत न्यायालयाने नोंदवले.
२०१७ मध्ये अटक झाल्यापासून कारागृहात असलेला सचिन मलोरे हा बेरोजगार असून मद्यपान करून आल्यानंतर आपल्याला शिविगाळ करायचा. त्याच्या या वागण्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी आपणही काम करत असल्याचे पीडित महिलेने न्यायालयाला सांगितले. घटनेच्या दिवशीही सचिन मद्यपान करून घरी आला. त्या वेळी आपण आईकडून आणलेले दही खात होतो. ते पाहून तो चिडला. दोघांमध्ये वाद सुरु झाला तो पत्नीला मांजरीसारखी लपून दही खात असल्याचे हिणवू लागला. आपण आईकडून आणलेले दही खात असल्याचे सांगूनही त्याने काही ऐकले नाही दोघांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर सचिनने मारहाण सुरू केली. तसेच आपल्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर आपल्याला जखमी अवस्थेत सोडून त्याने पळ काढला, असे महिलेने साक्षीत म्हटले होते.
तक्रारदाराची साक्ष, वैद्यकीय पुरावा तसेच प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या साक्षीवरून सचिनवर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले. उलटतपासणी दरम्यानही तक्रारदार महिला व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल असा पुरावा पुढे आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, आरोपीने बचावासाठी पाय घसरून पडल्याने पत्नीला दुखापत झाल्याचा दावा केला होता. मात्र, साक्षी व पुराव्यावरून आरोपीला गोवले गेल्याचे कोणतेही कारण पुढे न आल्याने तो दावा न्यायालयाने फेटाळला.