मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 रविवारी (दि. 11) घेण्यात येणार आहे. परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले केले असून उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा होणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. मात्र, परीक्षा होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
1) परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत बाळगा.
2) परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर राहणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
3) परीक्षा कक्षात मोबाइल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
4) परीक्षा उपकेंद्राच्या आवारात मित्र, नातेवाईक अथवा पालकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.
5) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र, इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.
6) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन पालन करणे आवश्यक आहे.
7) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून केलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
8) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
9) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.