पुणे बहुजननामा ऑनलाईन – एमपीएससी (MPSC) समन्वय समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापरीक्षा पोर्टलच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठींबा दिला असून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी यासाठी उपोषण करणाऱ्यांची भेट घेऊन जाहीर पाठींबा दिला आहे.
राज्य सरकार कडून सरकारी पदभरतीसाठी करार केलेल्या नवनियुक्त ‘महापरीक्षा पोर्टल’ कडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा ह्या संशयास्पद होत आहेत. महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकार केले जात आहेत. एकाच परिक्षेत सतत प्रश्नांची पुनरावृत्ती होते. या सर्व परीक्षा ठरवून दिलेल्या ठिकाणी होत नसून अधिकृत ‘परीक्षा केंद्र’ असा कुठलाही ‘नियम किंवा अटी’ या ठिकाणी लागू नसतात. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसते व वेळेवर कुठलीही परीक्षा होत नाही.
या महापोर्टल मार्फत राज्यभरात सावळा गोंधळ निर्माण झालेला असून नोकरीच्या भ्रष्टाचाराचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. परंतु यामध्ये महापोर्टल च्या मार्फत नोकरभरतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून अधिकृत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हे यामुळे लाखो होतकरू विद्यार्थी बळी पडत आहेत. म्हणून राज्य सरकारने संपूर्ण सरकारी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)मार्फत घेण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, हवेलीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उमेश कोरराम, शुभम फुलावरे, संजय पवार आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या –
१) महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात यावी.
२) बोगस विद्यार्थ्यांना पकडलेल्या डमी उमेदवारांची एसआयटीमार्फत चौकशी करावी.