मुंबई बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले एकमेव खासदार खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक काढून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलील यांच्या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली असून विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवून देण्याचे आपले लक्ष्य असणार आहे, असे जलील यांनी म्हटले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात एमआयएमला औरंगाबाद महापालिकेत २७ नगरसेवक निवडून आले होते. यानंतर पक्षाकडून मिळालेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीबाबत काय म्हणाले इम्तियाज जलील ?
”पक्षाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. निश्चित आगामी काळात समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहील. वंचित बहुजन आघाडी सोबत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी करीत पक्षाला यश मिळवून देण्याचा माझा संकल्प आहे.”