सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन मागील जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतचे थकीत असून चालू मार्च ते जून २०१९ या कालावधीचे वेतन परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. या प्रकरणी वारंवार तक्रार, पत्रव्यवहार, निवेदने देवून सुध्दा महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आज नाईलाजाने परविहन’ कर्मचा-यांना आज काम बंद आंदोलन करित प्रशासन आणि शासनाच्या विरोधात भीक मांगो’ आंदोलन करित असल्याचे मत शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
परिवहन कर्मचा-यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच काही कर्मचा-यांच्या मुलांनी उपाशीपोटी आत्महत्या आहे. ही अत्यंत शरमेची बाब असून संबंधित परिवहन व्यवस्थापक, कार्यालयीन अधिक्षक,तसेच महापालिका आयुक्तांना वारंवार सांगून कोणताही उपयोग होत नसल्यानेच आजपासून काम बंद आंदोलन करीत हे भीक मांगो आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याची मतं शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी यावेळी व्यक्त केले. भीकमांगो आंदोलनातून जमा झालेले पैसे हे प्रशासन आणि शासनाला देण्यात येणार आहे.
या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार, उपप्रमुख मुश्ताक शेतसंधी, नवनाथ साळुखे, संभाजी व्हनमारे, शब्बीर नदाफ, सचिन वेणेगुरकर, मुदस्सर हुंडेकरी, अकील शेख, जाबीर सगरी, प्रणव शेंडे, इब्राहिम जमादार, अभिजित कुलकर्णी, इम्रान शेख, समस्त परिवहन कर्मचारी आदी उपस्थित होते.