कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीना येडेकर (५५) आणि अनुराधा येडेकर (२७) या सासू सुनेचा विद्युत खांबावरील तार तुटल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडमुडशिंगी गावात असलेल्या ओढ्याला नेहमीप्रमाणे सासू मीना येडेकर आणि सून अनुराधा कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. ओढ्याच्या शेजारुन मोठ्या पोल वरुन विद्युत वाहिनी गेले असून, ती अचानक तुटून ओढ्यात पडली. त्याचबरोबर दोघींना विजेचा धक्का बसला. ग्रामस्थांना ही गोष्ट माहिती होताच त्यांनी तात्काळ महावितरणशी संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित केला. मात्र, त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला होता.
यासंदर्भात सातत्याने तक्रार करुनही महावितरणने याची दखल घेतली नाही. महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे सीपीआर शवविच्छेदन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी वेळेत कारवाई करु, अशी ग्वाही गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. त्यानंतर नातेवाईकांनी मृत्यूदेह ताब्यात घेतला. येडेकर कुटूंबातील दोन कर्त्या महिला एकाच वेळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.