बहुजननामा ऑनलाईन – सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीतेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर आरोपीची चांगलीच मारहाण केली. आणि आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात करण्यात आले. मधूर अनिल कासवा असे अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले ही आहेत.आरोपीचा हिंगणघाट येथे कापडाचा व्यवसाय आहे. तर पीडित विद्यार्थिनी नागपुरातील रहिवासी असून बीएस्सीची विद्यार्थिनी आहे.
काही दिवसांपूर्वीच आरोपी मधूर त्याच्या कुटुंबीयांसह उज्जैन येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कासवा कुटुंबियांचे जवळपास ५० लोक होती. आणि ही लोक परतीचा प्रवास करत होती. आरोपी आणि पीडित विद्यार्थिनी एकाच कोचमधून प्रवास करत होते. पीडित विद्यार्थिनी एकटी असल्याची संधी साधून आरोपी मधूरची वाईट नजर तिच्यावर पडली. बराच वेळ मधूर त्या विद्यार्थिनींकडे वाईट नजरेने पाहत होता. त्याच्या या घाणेरड्या प्रकारामुळे विद्यार्थिनी त्रासली होती. परंतु ती एकटी असल्याने ती शांत बसली होती. या तिच्या शांततेमुळे मधूर याची हिंमत जास्तच वाढली. विद्यार्थिनी झोपल्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार बैतुल ते आमला दरम्यान सकाळी ७ ते ७.३० च्या वाजता घडला.
या प्रकरानंतर विद्यार्थिनीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या तिच्या आरडा ओरडामुळे इतर प्रवासी आणि गाडीतील जवान कोचमध्ये पोहचले. या प्रकारामुळे कोचमधील प्रवासीही संतप्त झाले. परंतु आरोपी सोबत असलेल्या नातेवाईकांच्या संख्येमुळे प्रवासी शांत बसले. पीडितेने फोनवरून नातेवाईकांना घडलेली बाब सांगितली. लगेचच तिचे नातेवाईक नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहचले. गाडी प्लॅटफॉर्मवर येताच पीडितांच्या नातेवाईकांनी मधुरची चांगलीच धुलाई केली.