मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपने ठाकरे सरकार विरोधात गंभीर आरोप केले आहेत.
याचदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून त्याद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला लगावला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
तत्पूर्वी एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-6 इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. तसेच वाझे यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे 4 ते 5 तास चौकशी केली. वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली 5 लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्री, मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. चार तासांची घरझडती, कागदपत्रे पडताळणी, चौकशीनंतर तेथे राबोडी पोलिसांना बोलावले. सोसायटीतील काही रहिवाशांकडेही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.