बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता गुंडगिरीचा शिरकाव झाला आहे. मनसेच्या पदवीधर उमेदवार रूपाली पाटील (Rupali Patil )यांना ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू’ अशी जिवे मारण्याची धमकी सातारा जिल्ह्यातील एका तरुणाने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून, पाटील यांनी धमकी देणाऱ्यासअटक करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात १ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पदवीधरांच्या भेटी घेणे, प्रचार करणे असे काम करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे पदवीधर मतदारसंघातून रूपाली पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी अलीकडेच सातारा जिल्हा दौरा पूर्ण केला.
दरम्यान, शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने अज्ञात नंबरवरून फोन केला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर पुण्यात असशील तिथे संपवून टाकू’ अशी धमकी त्या व्यक्तीने दिली. त्यावेळी फोन हा पाटील यांच्या महिला सहकारीकडे होता. त्यामुळे या प्रकरणाने महिला सहकारी प्रचंड घाबरल्या आणि घडलेला प्रकार पाटील यांना सांगितला.
यासंदर्भात बोलताना रूपाली पाटील यांनी म्हटलं की, फोनवरून धमकी देण्यात आली असून, असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. पुणे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार असल्याने त्यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.