बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील राजकीय नाट्य जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते राजभवनात मंगळवारी संध्याकाळी गेले असता एका पत्रामुळे उशीर झाला ज्यामुळे आमदारांना दिन तास वाट पाहावी लागली.सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार राजभवनावर दाखल झाले. सत्ता स्थापनेचा दावा करणार महत्वाचं पत्र, तसेच महाविकासआघाडीला पाठिंबा असल्याचं आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र आणि इतर कागदपत्रही राज्यपालांकडे देण्यात आली. मात्र सर्व पत्रांमध्ये महत्त्वाचं असणारं एक कागदपत्र नव्हतं. त्यामुळे हे पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही , असं राज्यपालांनी संगितलं. त्यामुळे सर्व आमदार दोन तास राजभवनात त्या पत्राची वाट पाहात होते.
दरम्यान, महाविकासआघाडीच्या वतीनं मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मंत्रिपदाला सर्व आमदारांच्या सहमतीचंही पत्र जोडलं मात्र उद्धव ठाकरेंचं संमती असणारं पत्र त्यामध्ये नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत: जोपर्यंत मी मुख्मंत्रिपदासाठी तयार आहे. असं पत्र सादर करत नाहीत तोपर्यंत पुढची प्रक्रिया होणार नाही असं सांगताचा उद्धव ठाकरेंना संपर्क करण्यात आला. त्यानंतर तातडीने मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून राजभवनात पाठवलं आणि अखेर ठाकरेंचं सरकार आलं.
बुधवारी सकाळी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. यावेळी या आमदारांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या दारात उभ्या होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सुप्रिया यांना हात हातात घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे यांनी युवा आणि प्रथमच निवडून आलेल्या रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या नव्या पिढीतल्या आमदारांचं मिठी मारून जोरदार स्वागत केलं. अजित पवार आले त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी आनंदाने गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (गुरुवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. त्यानंतर महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com