बहुजननामा ऑनलाईन- एका वेळेला एकदाच एक महिला गर्भवती राहू शकते. मात्र फरीदाबादमध्ये एक चमत्कार झाला आहे. येथील काही महिला एकाच वर्षात चार वेळा तर काही आठ दहा वेळा गर्भवती राहिल्या आहेत. विज्ञानही यावर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु हा पराक्रम राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ईएसआय कॉर्पोरेशन) च्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी एका वर्षात चार वेळा तर काहींनी आठ ते दहा वेळा प्रसुतीचा लाभ घेतला आहे. यातील काही महिला तर फक्त कागोदपत्रीच होत्या त्यांना कंपनीत फक्त कागदोपत्रीच कार्यरत ठेवण्यात आले होते. हे प्रकरण इतके मोठे आहे की या प्रकरणाचा तपास केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) द्यावा लागला.
सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या चंदीगडयेथील पथकाने सेक्टर -२३ शाखा आणि ईएसआयच्या सेक्टर -१६ मधील क्षेत्रीय कार्यालयाच्या कागदपत्रांची छाननी केली. यात एक हजाराहून अधिक महिला अशा आहेत, ज्यांना एकाच वर्षात अनेकदा प्रसुती रजेदरम्यान मिळणाऱ्या वेतनाचा लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात मात्र अशा कोणत्याही लाभार्थी महिलेला प्रसुती रजेदरम्यान लाभ मिळाला नाही. ती महिला फक्त कागदपत्रांवर एका कंपनीत काम करत होती. कागदोपत्री अनेक महिलांना एकाच वर्षात गर्भवती दाखवून ईएसआय कॉर्पोरेशनकडून प्रसूतीचा लाभ घेण्यात आला. यात मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारापासून ईएसआयच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
खासगी कंपन्यांमध्ये काम कऱणाऱ्या ज्या महिलांचे मासिक वेतन २१ हजारांहून कमी आहे अशा महिलांचे योगदान ईएसआय कॉर्पोरेशनमध्ये वजा केले जाते. प्रसुतीसाठी या महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा व संपूर्ण वेतन दिले जाते. याला एसी मातृत्व लाभ म्हणतात. तसेच गर्भपात झाल्यास ४२ दिवसांची रजा दिली जाते. या रजेचे पैसे महामंडळ त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा करते. मात्र या सुविधेचा चुकीचा फायदा घेण्यात आला. यात महिलांनी एकाच वर्षात चार वेळा तर काही महिलांनी दहा वेळा स्वत: ला गरोदर असल्याचे दाखवून ईएसआय कॉर्पोरेशनकडून पैसे घेतले. यातील संपुर्ण यंत्रणा इतकी बिघडलेली होती की, चुकीच्या पद्धतीने खोटी बिले पास करताना कोणलाही कसलाच त्रास झाला नाही.
ईएसआय कॉर्पोरेशनच्या तपासणी अहवालात दोन-तीन प्रकरणांमध्ये गडबड असल्याचे आढळून आले होते. यात ऑनलाईन अर्ज आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी करताना दोन्हीही वेगवेगळे सापडले. यात महिला एक तर तिचे बॅंक खाते दुसरेच असायचे. पण ती वेगवेगळ्या नावाने प्रसुती रजेचा लाभ मिळवत होती. तिची कागदपत्रे बनावट होती. काही कंत्राटदारांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे बनविली होती. त्या प्रमाणपत्रावर स्थानिक आणि प्रादेशिक कार्यालयातील डॉक्टराकडून शिक्के मिळविले. त्याद्वारे त्यांनी प्रसूती रजेचे पैसे घेतले. विशेष लेखापरीक्षण कार्यसंघाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी दरम्यान अशी अनेक लाभार्थ्यांची बँक खाती आढळली आहेत ज्यात प्रसूतीच्या रजेच्या नावाखाली एकाच वर्षात अनेक वेळा पैसे जमा केले गेले. जेव्हा हे प्रकरण मोठ्या प्रमाणात आढळून आले तेव्हा याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात १० अधिकारी व कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाचे वकील पद्मश्री ब्रह्मदत्त म्हणाले की, ईएसआय कॉर्पोरेशनची संपूर्ण यंत्रणा इतकी ढासळली होती की, एकाच महिलेला एकाच वर्षात अनेकदा प्रसूतीचा लाभ मिळाला. या प्रकरणात खालपासून वरपर्यंतचे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यात एक जरी लाभार्थी एक महिला असेल तर तिलाही गुन्हेगार ठरवून संपूर्ण पैसे आकारले जातील. या प्रकरणात, भ्रष्टाचाराची संपूर्ण साखळी तोडली पाहिजे.
यासंदर्भात ईएसआय कॉर्पोरेशनचे अतिरिक्त आयुक्त डीके मिश्रा यांच्याशी बोलण्यासाठी फोन करण्यात आला. मात्र प्रसूती घोटाळ्याचे नाव ऐकताच मिश्रा यांनी फोन डिस्कनेक्ट केला. तर महामंडळाचे बिगर अधिकृत सदस्य बेचू गिरी म्हणाले, हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे. जेव्हापासून हा तपास सीबीआयकडे गेला, तेव्हापासून अधिकाऱ्यांनी आपली तोंडे बंद केली आहेत. कारखान्यात कंत्राटी नोकरीवर काम करणाऱ्या महिलांना बनावट प्रमाणपत्रात त्याने गर्भवती दाखविण्यात आले आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याने त्यांच्या नावावर सरकारी खात्यातून पैसे काढले.