नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे मंत्रालयाने 109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला 12 कलस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. या 12 क्लस्टरमध्ये 109 जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रत्येक रेल्वे कमीतकमी 16 डब्ब्यांची असणार आहे . तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असून ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करणार आहे.
कामासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट 30 हजार कोटी रुपये ठेवले आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालवण्याचा हा खासगी गुंतवणुकीचा पहिला उपक्रम आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानास चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीच्या खर्चाचे ओझे कमी करणे हे आहे. यामुळे ट्रान्झिट टाईम कमी होणार आहे. तसंच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, सुरक्षेचीही योग्य ती काळजी घेतली जाईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातील, असे रेल्वेने म्हटले आहे .