नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – समाज एकत्र आल्यास त्या समाजाला बळकटी येते. आज ज्याप्रमाणे सासू-सुनांनी घरातही कायम नाते जोपासावे, जेणे करुन घरातील वातावरण पोषक राहील. यातून येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार रुजतील, असे प्रतिपादन नुकतेच रुजू झालेले नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांनी केले. ते येथील बडगुजर समाजाच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते.
येथील नगरपालिका शाळा क्र. १ येथे बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांसाठी विविध खेळ, तसेच समाजाची वार्षिक सभा झाली. मंडळाने बेटी बचाव बेटी पढाव संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात समाजातील लहान मुलींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नंदवाळकर म्हणाले की, नंदुरबार शहरातील बडगुजर समाजाच्या कार्यक्रमास समाजाची उपस्थिती तसेच मंडळाने घेतलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. यापुढे समाजाच्या मदतीसाठी मी बांधील असल्याचे नंदवाळकर म्हणाले. समाजात घडणाऱ्या सुख-दुखाच्या घटनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी सौ.सुनिता मनोज बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी खेळातील विजेत्यांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. कार्यक्रमात बडगुजर समाजाचे वेब पोर्टल तसेच बडगुजर ॲपची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप बडगुजर यांनी केले. तर आभार पंडीत बडगुजर यांनी मानले. यशस्वीतेसाठी रविंद्र बडगुजर, संदीप बडगुजर, देविदास भगवान बडगुजर, दिनेश बडगुजर, विजय बडगुजर, भरत कोतवाल, गणेश बडगुजर, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर, भाईदास बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.