बीड : बहुजननामा ऑनलाइन – तरुणांच्या मराठा जातीची प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रकरणे त्वरित निकली काढण्यात यावे यासाठी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
गेल्या २५ ते ३० दिवसांपासून उपविभागीय कार्यालयातून मराठा जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रकरणे त्रूटी काढत अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले. शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे ही प्रकरणे निकाली काढण्यात यावी अशी सातत्याने मागणी करण्यात आली होती. परंतु यावर कसलीही कार्यवाही न झाल्यामुळे शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षय माने, अनिल घुमरे, रामहरी मेटे, सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.