मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. त्यातच आता मनसुख हिरेन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. हिरेन यांची गाडी 17 फेब्रुवारीला चोरीला गेल्यानंतर 18 तारखेला त्यांनी विक्रोळी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर ही गाडी अंबानींच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर हिरेन यांच्यामागे पोलीस आणि माध्यमांचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे हिरेन यांनी माझ्याकडून याबाबत कायदेशीर सल्लाही घेतला होता.
मनसुख हिरेन यांना झालेल्या त्रासाबाबत वकील गिरी यांनी सांगितले की, दर एक दोन तासांनी पोलीस येऊन प्रश्नाची सरबत्ती करत असत. कुटुंबीयांना झोपू दिले जात नसे. प्रसारमाध्यमांकडूनही विचारणा व्हायची. त्यामुळे मनसुख हिरेन आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त होते. मात्र सचिन वाझेंबाबत त्यांनी मला काही सांगितले नव्हते. उलट वाझे हे आपले मित्र आहेत. त्यांना माझी मदत करायची, असल्याचे त्यांनी मला सांगितले होते, असा दावा हिरेन यांचे वकील गिरी यांनी केला.
दरम्यान अंबानीच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी निगडित एटीएस पथकासह विविध यंत्रणाकडून तपास सुरु आहे. त्या अनुषंगाने हिरेन यांच्या कुटुंबीयांना रोज चौकशींना सामोरे जावे लागत असल्यामुळे हे कुटुंब हैराण झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.