पुणे : बहुजननामा ऑनलाईन – येथील खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील कचरा डम्पिंग डेपोमध्ये एका पिशवीत चक्क माणसाच्या हाताचा तुटलेला व रक्ताळलेला पंजा आढळला. याबाबत घंटागाडीच्या चालकाने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कचरा डम्पिंगमधील सर्व कचऱ्याची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
खराबवाडी येथील दगड खाणीत अनेक गावचा कचरा येत असल्याने तुटलेल्या हाताचा पंजा कुणाचा? याचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान ठरणार आहे. घंटागाडी चालक दत्तात्रय मुकुंद गायकवाड (वय ३१, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घंटागाडी चालक दत्तात्रय गायकवाड शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चाकण शहरातील माळआळी, सिकिलकर हॉस्पिटल, चाकण बाजारपेठ इत्यादी ठिकाणाहून कचरा गोळा करून बिरदवडी जवळील खराबवाडीच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडवर कचरा खाली केला.
यावेळी येथील सुरक्षारक्षक अनिल लेंडघर (रा. राणूबाईमळा, चाकण) यांनी गायकवाड यांना त्यांची गाडी खाली करीत असताना गाडीतील एका कचऱ्यातील पिशवी चाळत असताना भंगार गोळा करणाऱ्या महिलेस हाताचा तुटलेला पंजा सापडला. या घटनेची माहिती चाकण पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कचरा तपासणीच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच परिसरातील खासगी रुग्णालयातून हा पंजा कचऱ्यात आला का? याचाही तपास पोलीस घेत आहेत.