पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बदलत्या काळानुसार विवाहाची पद्धतदेखील बदलत गेली. सध्या एक नवीन ट्रेंड आला आहे. तो म्हणजे प्री-वेडिंग फोटोग्राफी. यासाठी नवीन जोडपी भामसाथ खर्चदेखील करायला मागेपुढे पाहत नाही. ही फोटोग्राफी कधी डोंगरदऱ्यांमध्ये तर कधी नदीकाठी एकूणच काय तर निसर्गाच्या सान्निध्यात फोटो काढण्याची अनेक जोडप्यांना क्रेझ आहे. आज आम्ही तुम्हाला एका जोडप्याने अनोख्या पद्धतीने केलेले फोटोशूट दाखवणार आहोत की जे बघून तुम्ही नक्कीच त्यांचं कौतुक कराल. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या महापुरुषांचा वेष परिधान करून पुण्यात राहणाऱ्या श्वेता आणि मंगेश या जोडीने अनोख्या पद्धतीचे प्री वेडिंग शूट केलेले आहे, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखा वेश परिधान करून श्वेता आणि मंगेश यांनी लग्नाआधीचे फोटोशूट केले आहे.
मुळात श्वेता आणि मंगेश या दोघांनाही चळवळीची पार्श्वभूमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई या जोडप्याला ते आदर्श मानतात, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण सहजीवनाची सुरुवात करावी, या हेतूने अशा आगळ्या वेगळ्या प्रकारचे फोटोसेशन केल्याचे ते सांगतात, त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.