बहुजननामा ऑनलाईन टीम – आज सकाळी अचानक मुख्यमंत्रिपदाची शपथविधी झाल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. संपुर्ण राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळामध्ये राष्ट्रवादी आमदाराचा एक गट अजित पवारांसोबत जाऊन त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. आज सकाळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथ दिली. यामुळे पवार कुटुंबातील कलह लोकांसमोर आला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे काही आमदारांनी अजित पवार यांना ठामपणे पाठींबा दिल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी एका मिडीया हाऊसशी बोलताना सांगितले की, एवढ्या दिवस सरकार भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थापन होईल हा घोळ महिन्याभरापासून चालू होता. त्यामुळे मी निर्णय घेतला की, काही झाले तरी राष्ट्रवादींसोबत रहायचे. आता मी अजित पवार यांच्यासोबत फिरत आहे.
त्याचबरोबर सध्याची परिस्थिती पाहिली तर दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे हे शक्य नव्हते. सुरुवातीला शिवसेनेने आपल्याकडे विविध पर्याय असल्याची भूमिका मांडली होती. राज्याची परिस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे बहुमत आहे आणि विहीत मुदतीत ते सिद्ध करु, असा दावा भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल इतका मोठा निर्णय घेतील हे आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही सदस्य अजित पवारांसोबत असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, हा निर्णय पुर्णपणे कॉंग्रेसच्या विरोधात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधिमंडळ सदस्य असो किंवा कार्यकर्ता तो भाजपासोबत सत्ता बनविण्यासाठी तयार नाही. आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे.’
शरद पवार पुढे म्हणाले की, ‘त्यांच्यासोबत जे सदस्य गेले आहेत किंवा जाणार असतील त्यांनी मी २ गोष्टींची आठवण करुन देतो की, पक्षांतर बंदीचा कायदा देशात आहे आणि त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. महाराष्ट्रातील जनमानस हा भाजपाविरोधात आहे. सत्तेविरोधात जनमत असताना अशा व्यक्तींच्या विरोधात मतदारसंघातील सामान्य माणूस कदापि उभा राहणार नाही. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन व्यक्तींविरोधात उमेद्वार देऊ, अन् जे फुटले आहेत त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही.’
Visit : bahujannama.com