सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराज यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार निशाणा साधला आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असा सल्ला शरद पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.
“साधू-संत कुणाकडे काहीही मागत नाहीत. आणि मागणारा कधीच संत होऊ शकत नाही. मात्र सोलापुरातील महाराज मते द्या म्हणून फिरत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली. मी कोणत्याच महाराजांचा अनादर करत नसल्याचं म्हणत, शरद पवारांनी पुढे लोकसभेत निवडून आलेल्या महाराज मंडळींचा चांगलाच समाचार घेतला आहे.
गेल्या लोकसभेत भाजपने आठ-दहा महाराज निवडून आणले. निवडून आणलेले महाराज भगवे घालून संसदेत बसले खरे, मात्र संसदेत एकदाही तोंड उघडले नाही अशी टीका पवारांनी केली. महाराज मठात जायचं सोडून इकडे कुठे चाललात, असा टोलाही लगावला. “महाराजांना विचारल्यावर परमेश्वर की कृपा है, आज बेहत्तर है, कल या परसो बेहत्तर होगा, सबका कल्याण करेंगे, असे महाराज म्हणत आहेत. मात्र इकडे प्यायला पाणी नाही. तरुणांना नोकरी नाही, त्याचं काय?” असा सवाल शरद पवारांनी केला.