बहुजननामा ऑनलाइन – जागतिक दर्जाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला(mahabaleshwar) आतापर्यंत पर्यटनस्थळाच्या वर्गवारीत स्थान मिळाले नव्हते. पण नुकतेच राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिल्याने महाबळेश्वरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे . राज्य शासनाने नुकतीच महाबळेश्वर(mahabaleshwar) नगरपालिका क्षेत्रास ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली आहे.
धार्मिक स्थळ म्हणून महाबळेश्वरची फार पूर्वीपासून ओळख आहे. इंग्रजांच्या आगमनाने इथला चेहरामोहराच बदलून गेला. विविध पॉइंट्सची नावे ऐकल्यास इंग्रज अधिकार्यांची आठवण होते. सर जॉन माल्कम या इंग्रज अधिकार्याच्या ‘महाबळेश्वरवरील प्रेमापोटी इथली बाजारपेठ वसवली गेली. महाबळेश्वर शहराला पर्यटनस्थळ वर्गवारीमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यासाठी नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी पर्यटनस्थळाच्या वर्गवारीचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी दोन वर्षे पाठपुरावा केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासमवेत महाबळेश्वर येथे खासगी दौर्यानिमित आले होते. त्यांनी महाबळेश्वर पर्यटनस्थळाची देशात वेगळी ओळख असावी असे सांगत, शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात पर्यावरणास हात न लावता पर्यटनवाढीस प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार ‘एक विशेष बाब’ म्हणून महाबळेश्वर नगरपालिका क्षेत्रास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.