बहुजननामा ऑनलाईन टीम : मध्य प्रदेशमध्ये एका बँकेमधून चक्क एका 10 वर्षीय मुलाने 10 लाखांची चोरी केली आहे. निमच जिल्ह्यातील जवाद परिसरातील बँकेमध्ये मुलाने अवघ्या 30 सेकंदांमध्ये 10 लाख रुपये लंपास केले आहेत. चोरीनंतर बँकेतील ग्राहकासह कर्मचार्यांना याबद्दल काही पत्ताच लागला नाही. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटजेमध्ये एक 10 वर्षीय मुलगा सकाळी अकरा वाजता सहकारी बँकेत प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर हा मुलगा थेट पैसे ठेवलेल्या जागी जातो.
या काउंटरसमोर ग्राहकांची मोठी रांग असल्याने कोणाचे या मुलाकडे लक्ष जात नाही. उंचीने लहान असल्याने मुलगा अगदी टेबलाच्या आणि काउंटरच्या पलिकडे असल्याने दिसून येत नाही. मुलगा काउंटवरील नोटांचे एक बंडल बॅगेत टाकून चालत तिथून निघून जातो. सर्व चोरी त्याने अवघ्या 30 सेकंदांमध्ये केली आहे. दरवाजाबाहेर आल्यानंतर हा मुलगा पळू लागतो.
कोणाला काय घडले हे कळण्याच्या आतच हा मुलगा चोरी करुन बँकेबाहेर पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, त्यामध्ये एक तरुण मुलाला सर्व माहिती देत असल्याचे दिसून आले आहे.हा तरुण बँकेत 30 मिनिटांहून अधिक काळापासून उपस्थित असल्याचे फूटेजमधून स्पष्ट होत आहे. कॅश काउंटवरील कर्मचारी जागेवरुन उठल्याचे पाहताच हा तरुण बँकेबाहेर असणार्या या लहान मुलाला इशारा करतो. हा मुलगा आत येतो 500 रुपयांच्या नोटा असणारे दोन मोठे बंडल बॅगेत टाकतो आणि बँकेच्या बाहेर निघून जातो असेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.