बीड : बहुजननामा ऑनलाईन – मराठा, धनगर आणि वंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर यापुढे भगवान सेना आणि शिवसंग्राम एकत्रीत येऊन लढेल, अशी माहिती भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी परळी येथील भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट दिली. फुलचंद कराड हे भाजपातील जेष्ठ नेते म्हणूनही ओळखले जातात. परंतु ते गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यापासून दूर आहेत. यातच पंकजा मुंडे यांच्याशी पटत नसलेले विनायक मेटे यांनी कराड यांची भेट घेतल्याने राजकिय चर्चेला उधाण आले.
यानंतर कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना कराड म्हणाले, आ. मेटे आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि भगवान सेना या द्वारे मराठा, धनगर आणि वंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रित येऊन कार्य करतील. त्यामुळे मेटेंच्या या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. शिवाय मी भाजपही सोडलेली नाही. मराठा, धनगर, समाजाचे आरक्षण असेल किंवा वंजारा समाजातील काही प्रश्न असतील या बाबतीत आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत. आ. विनायक मेटे यांनी देखील आम्ही समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र येत असल्याचे म्हटले.