बहुजननामा ऑनलाईन – दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी फरार आरोपींना पकडण्यासाठी बक्षिसाची रक्कम पन्नास लाख करण्यापेक्षा पोलिस विभागाने आरोपींना पकडण्याची इच्छा शक्ती दाखवावी तसेच तपासाबाबत होम मिनिस्टर या नात्याने मुख्यमंत्र्यांनीही एखाद्या गुन्हाची उकल करताना तपास यंत्रणेला काय अडचणींना सामोरे जावे लागते, तपास का होत नाही, यावर लक्ष ठेवायला हवे पानसरे हत्या प्रकरणातील तपासावरुन मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहे.
यापूर्वी १४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत देखील हायकोर्टाने सरकारला झापले होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाला होणारा विलंब आणि मारेकऱ्यांना शोधण्याच्या तपास यंत्रणांच्या पद्धती हे चेष्टेचे विषय झाले आहेत. त्यामुळे राज्याचे हसे होत आहे, असे ताशेरे ओढून तपासाच्या विलंबाबाबत राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांनी न्यायालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, असे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले होते.